बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिडा केली
बरे झाले दिली बाईल कर्कषा होतसे दूर्दशा संसाराची
तुकोबांच्या या अभंगातून तर सगळे वाटोळे झाले हे खुप बरे झाले असाच अर्थ ध्वनित होतोय. यात कसले बरे झाले असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या सगळ्या संकटामुळे आणि नुकसानी मुळे पांडुरंगाच्या ठाई सगळा मोह सारून तुकोबा एकरूप होऊ शकले. हेच तर तुकोबांना हवे होते. संसारात काही राम नाही तर खरा राम पांडुरंगाच्या चरणी आहे. हे तुकोबांना उमगले होते. आणि तेच तर त्यांनी जगाला सांगितले.
लोकांना देव आठवतो तो संकटाच्या वेळी. दानधर्म करावा तो मृत्युच्या वेळेला आजारी पडल्यावर चारदोन भिका-याला दहा पाच रूपये देउन स्वास्थ्य मिळावे असा व्यवहार आपण करू लागतो. देवा या संकटातून दूर कर मी अमुक देईन, तमुक करीन अशी सोदेबाजी सुरू होते. काळ वाईट आला की देवाची आठवण होते. आणि चांगला काळ असला की त्याची साधी आठवन देखील होत नाही. काम हाच देव. मी कामातून त्याची पूजा करतो. हे थोतांड मला मान्य नाही असे सांगणारे सगळे त्याच कामात अडचण आली की मग त्याच्या पायी लोटांगण घेऊ लागतात. स्वत:वरचा विश्वास एवढा तकलादू कसा? का फक्त अडचणीच्या काळात त्याची आठवन होते. मग महामृत्युंजय चा जाप, तीर्थाटने, ब्राह्मनांना दान धर्म, या आणि असल्या सवंग प्रकारांची जोरदार चलती असते. येथे देखील मी किती करतोय हा भाव असतो.
एकदा एक माणुस नदीच्या किना-यावरून चालत निघाला आणि चालता-चालता त्याचा जीवनपट त्याच्या डोळ्यासमोरून तरळू लागला सुख दु:खाचे दिवस त्याला दिसू लागले.आय़ु,यातील संघर्ष त्याच्या डोळ्यासमोरून जाऊ लागला तो चालतच राहिला. सगळा जीवनपट स्मरून झाल्यावर सहजच त्याचे लक्ष वाळूकडे गेले. तो जेंव्हा सुखाच्या दिवसात होता. तेंव्हा त्याच्या पावलासोबत आणखी दोन पावले त्याला दिसली. ती देवाची पावले असावित. दु:खाच्या दिवसात मात्र केवळ दोनच पावले दिसत होती. आणि परत सुखाच्या दिवसात चार पावले दिसत होती. या माणसाने ओळखले आणि सरळ देवाकडे पोहचला देवा समोर उभा राहून म्हणाला,
“देवा काय रे! तू पण सुखाचा सोबती का?”
देव म्हाणाला, “का रे बाबा तुला असे का वाटले अचानक मी तर सदैव सोबत असतो सगळ्यांच्या.”
तो माणुस म्हणाला “बघ जरा खाली, मी जेव्हा सुखात होतो तेंव्हा तू सोबत होतास बघ तुझी पावले दिसत आहेत. आणि मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा मात्र केवळ माझीच पावले दिसत आहेत. तू कोठे गेला होतास तेंव्हा? सुख परतल्यावर तू पुन्हा सोबत आलास. बरे झाले निदान तुला हे तरी कळाले की तू सोबत नसलास तरी माझ्या प्रयत्नाच्या जोरावर मला सुख परत मिळवता आले पण तू केवळ सुखात सोबत असतोस हे तरी सिध्द झाले. ”
देव फक्त मंद हसला आणि म्हणाला “वेडा रे वेडा अजुनही वेडाच राहिलास तू निट बघ जरा वाळूवर तू सुखातून दु:खाच्या दिवसात गेल्यावर मीच तुला उचलून घेतले होते तुझ्या पायात तर चालण्याचे बळच नव्हते. सुखात आल्यावरच तुला खाली उतरवले निट बघ अडचणीच्या काळातील पावले तुझी नाहीत तर माझी आहेत. बघ तुच जरा निट. तू तर माझ्या हातावर अलगद होतास म्हणुनच तर अडचणीतून तरून जाऊ शकलास...”
एवढे बोलून देव अंतर्धान पावला.
त्या माणसाला आपली चुक उमगली खरी, पण अशी अनेक माणसे आहेत ज्यांना आपली चुक अजून कळालेली नाही दान धर्म करताना सुध्दा मी करतोय. मी देतोय हा भाव कायम असतो. जिथे आपले पोट भरण्यासाठी धडपड चालू असते जे मिळालेय ते कमी आहे असे वाटत असते माझे भागले माझ्या पोराचे भागले पाहिजे. ही भावना मनात असणारे ढोंगी दान धर्मकरून आपण देवाचे करतो हा अहं मनात ठेवत असतात. देवाची पूजा तरी का करायची. देवा मला सुखी ठेव हे मागण्यासाठी तो जे करणारच आहे ते त्याला मागायचे तरी का? त्याला आठवन राहवी म्हणुन स्थान, काळ, वेळ सगळे पुजेत सांगायचे काय काय मागतो आपण धन, धान्य, आय़ु,आरोग्य हे सगळे मिळावे टिकावे यासाठी सगळा अट्टहास चाललेला असतो. त्याच्या बदल्यात त्याला काय तर किडक्या सुपा-या, वाळलेल्या किडूक मिडूक खारका, पुन्हा पुन्हा पूजेत वापरून कुंकवाने लाल झालेले बदाम आणि पसा पसा धान्य जे शेवटी मध्यस्थाचे धन होते. जो असंख्य करांनी हे सगळे आपल्याला देत असतो त्याला किडकं द्यायचं आणि तो मागतही नसताना. भाजीवर तेलाची फोडणी मिळावी म्हणुन त्याची काही लेकर कष्ट करत असतात आणि महिण्याला अनेक लिटर तेल नंदा दीपासाठी त्याचीच लेकरं जाळत असतात. त्याच्या देव्हृयात प्रकाश केल्याचा अहंकार मनात जपत. या असल्या गोष्टी ऐवजी त्याच्या लेकराच्या घरात आपण दिवा पेटवू शकलो तर त्याला किती बरे वाटेल. तो आपल्या एखाद्या लेकराला सगळी सुखे का देतो? ?याचा कधी विचार केलाय. एकाला मोठे केले तर तो दुस-याला आधार देईल यासाठी पण दुस-याला आधार देणे तर सोडाच पण तो देवालाही विसरतो १० बाय १० ची फरशी मंदीरात बसवून ११० वर्ष दिसेल असे नाव त्यावर कोरून घेत असतो. कशासाठी तर मी दानशूर आहे हे कळण्यासाठी.
very nice
उत्तर द्याहटवा-gopal kulkarni