हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ७ जुलै, २०११

येथ जातिकुळ अप्रमाण

भगवंत आणि भक्त यांच्यातील नाते विलक्षण आहे. नवविधा भक्ती प्रकाराच्या पलिकडचे हे सगळे आहे. माणसांनी निर्माण केलेली सगळी बंधने झुगारून हे नाते वाढत असते, बहरत असते.जाती पातीच्या चौकटी या भक्तीला मान्य नसतात. अलिकडच्या काळात जाती निर्मुलनासाठी अनेक प्रयत्न सरकारी आणि गैरसरकारी पातळीवर होताना दिसतात. अनेक महात्मे आणि समाजसुधारक यासाठी लढताना दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमुर्ती रानडे अशी अनेक नावे आहेत ज्यांनी समाज जागृतीचे काम केले. छत्रपती शाहू महाराजांनी तर या प्रयत्नांना राजाश्रय दिला आणि या चळवळीला बळ मिळाले. पुढे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी झंझावात निर्माण केला आणि सामाजिक ऐक्याच्या प्रयत्नांना कायद्याचे बळ मिळाले. पण हजारे वर्षाची परंपरा असलेल्या या देशात शेकडो वर्षापासून हे प्रयत्न होताना दिसतात.
साडेतिनशे वर्षापूर्वी जगद्गूरू संत तुकारामांनी हाच संदेश दिला. त्यांच्या अभंगवाणीतून भक्तीच्या प्रांतात जातीपेक्षा भावना महत्वाची असते तुकोबांनी सांगीतले. सामाजिक समतेचा समरसतेचा विचार तुकारामांनी दिला.
तुका म्हणे नाही जातीसवे काम ज्याचे मुखी नाम तोचि धन्य
जात महत्वाची नाही हे पटवून देताना तुकोबांनी अनेक दाखले दिले आहेत. या दाखल्यातून कुळ जाती वर्ण यापेक्षा मनातली भावना महत्वाची हेच पटवून दिले. म्हणून तर विठोबा रखूमाईचा गजर करत चंद्रभागेच्या वाळवंटात देहभान विसरून किर्तनी रंगणा-या वारक-यांना एकमेकाच्या जातीची साधी आठवण देखील होत नाही.
काय रूपे असे परिस चांगला धातू केली मोला वाढ तेने
फिरंगी आटिता नये बारा रूके गुणे मोले विके सहस्त्रवरी
आणिक ही तैसी चंदनाची झाडे परिमळे वाढे मोल तया
या उदाहरणातूनच तुकोबांची सामाजिक समतेची शिकवन समोर येते. परिस त्याच्या रूपावरून नाही तर लोखंडाचे सोने करण्याच्या त्याच्या गुणामुळे मोलाचा ठरतो. रत्न जडीत तलवार त्यावर लावलेल्या रत्नामुळे नाही तर त्या तलवारीच्या धारेमुळे किमंती ठरते. तलवारीचे लोखंड वितळवले तर त्याची काहीच किंमत होणार नाही. पण जेंव्हा ती धारदार होते तेंव्हा ती हजारोची होते. चंदनाच्या झाडाचेही असेच आहे. त्याच्या रूपावरून त्याची किंमत ठरत नाही तर अंगभूत शितलता आणि सुगंध त्याचे मोल वाढवतात. भक्तीतही असेच आहे. कोण कोणत्या जातीत जन्माला आला यावरून त्याची भक्ती वा दर्जा कमी अधिक होत नाही. जात महत्वाची नाही तर भक्ती महत्वाची असते.
तुकारामांनी ये-या गबाळ्याचे काम नाही असे सांगत जात महत्वाची आहे असे देखील सांगितले आहे. पण ही जात वेगळी आहे. येथे तुकोबांची जात वेगळी आहे.
नका दंतकथा सांगो येथे कोणी कोरडे माणी बोल कोण
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार न चलती चार आम्हा पुढे
निवडी वेगळे क्षिर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगाळली
या आशयाची जात तुकारामांना हवी होती. हरिजनाच्या (त्यावेळेचा अंत्यज) मुलाला कडेवर घेणारे एकनाथ, चोखाची उराउरी भेट घेणारा ज्ञाना हे सगळे तुकोबांच्या त्याच जातीतले नव्हेत का? हीच जात सांभाळली गेली पाहिजे एवढे मात्र नक्की
जन्मता विटाळ मरताची विटाळ मध्यंतरी सोवळे कैसे बप्पा?
हा प्रश्न देखील विटाळ चांडाळाचे चांडित्य मांडणा-या पढतमुर्खांसाठी झणझणीत अंजनच नाही का? देव खरेच जात माणणारा असता तर तो देव कसला? मग त्याच्याच भक्तांनी तरी ती का पाळयाची? माणसांनी ही बंधने घातली निर्माण केली आणि पालन केले नाव मात्र देवाचे लावले. प्रत्येक जिवात चराचरात देव असतो हे मान्य केले तर परमेश्वराचे अस्तीत्व असलेला एखादा जीव पवित्र आणि एखादा जिव अपवित्र असे कसे होईल. आणि एखादा जिव अथवा जात अपवित्र मानणे हा परमेश्वराच्या अंशाला अपवित्र माणणे होणार नाही का?
नको देवराया अंत आता पाहू’,  अशी आळवणी करणारी कान्होपात्रा गणिका होती म्हणुन तिची भक्ती पांडुरंगाने कमी माणली नाही. नामदेवाच्या किर्तनी प्रत्यक्ष शंकर रममाण झाला. ते ऐकण्यासाठी त्याने आपल्या मंदीराचे दार औंढ्यात वळवले. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे आळवून आपल्या श्रमात परमेश्वर पाहणा-या सावतास त्यांचा पांडुरंग अत्यंत आपुलकीने भेटतो. जन दूर दूर हो म्हणती तुज भेटू कवण्यारिती अशी तक्रार करणा-या चोखामेळ्यास त्यांचा देव मंदीरा बाहेर येऊन भेटतो. जिथे खरी भक्ती तिथे देव असतोच. कुब्जेचा मथुरेत जाऊन उध्दार करणारा कृष्ण, शबरीची मोठ्या श्रद्धेने आणलेली उष्टी बोरे खाणारा प्रभू राम ही सगळी देव जर जात धर्म पंथ आणि जन्माचे बंधन माणत नसतील तर ती निर्माण करण्याचा आणि पाळण्याचा अधिकार आपल्याला  कोणी दिला याचा साधा विचार देखील मनात येत नाही. की या सगळ्या कथाच खोट्या आहेत? असा आपला समज झालाय. तुकारामांच्या भक्तीचा प्रताप एवढा मोठा की तुकोबाची भाकरी भामगिरीच्या डोंगरावर घेऊन जाणारी तुकोबाची पत्नी आवडा बाई यांच्या पायतला काटा विठोबाने काढला. ज्याचे पाय धरायला सगळे जग आसुसलेले असते त्या सावळ्याने चक्क आपल्या भक्ताच्या पत्नीचे पाय धरले आणि तिची वेदना दूर केली मग देव जर आपल्या भक्ताची एवढी काळजी घेत असेल तर मग आपणच जाती पातीवर एखाद्याचे महत्व कमी एखाद्याचे महत्व जास्त असे समजण्याचा नादानपणा का करायचा.
परमेश्वर एवढे सगळे संकेत देत असेल आणि ते आपल्याला कळत नसतील आपण त्या चरित्रातील सोईचा अर्थ घेत आणि लावत असू तर आपण दुधखुळेच ठरू. भगवान श्रीकृष्णाने उच्च कुळातील दूर्योधनाच्या घरचे अन्न खाण्यापेक्षा उच्च विचाराच्या विदूराच्या घरचे अन्न खाणे पसंद केले ही कथा जन्मापेक्षा भाव महत्वाचा हा विचार आपल्या  मनात निर्माण करत नसेल पालथ्या घड्यावर पाणीच म्हणावे लागेल.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा