पंढरपूरच्या जवळ येताच मन त्या सावळ्याच्या दर्शनासाठी आसुसलेले असते. धाव्याच्या थांब्यानंतर तर पावले धावत पंढरीकडे जायला लागतात ‘तुका म्हणे धावा पंढरीसी विसावा’ असा अभंगही या ओढीसाठी निर्माण झाला. एवढी अनिवार ओढ त्या मेघःशामाच्या दर्शनासाठी लागलेली असते. पंढरीचे राऊळ दिसायला लागते आणि हृदयाची धडधड वाढू लागते एक अनामिक हूरहूर लागून राहते. आणि धावतच पावले पुढ् सरकू लागतात. चंद्रभागेचे विस्तीर्ण वाळवंट लागत चंद्रकोरीच्या आकाराची भीमा माउली भासू लागते या वाळवंटातील वाळूचा प्रत्येक कण नी कण पवित्र वाटू लागतो. कारण विठोबा रखूमाईचा गजर करत ज्ञानोबा माऊलींची सोनपावले मुक्ताईच्या चिमुकल्या पावलासह ईथेच फेर धरत होती. तुकोबांच्या मुखातून पडलेल्या प्रत्येक शब्दाने ईथल्या वाळूचा प्रत्येक कण पवित्र झाला आहे. चोखामेळ्याच्या पदस्पर्शाने ही वाळू ईतकी पवित्र बनलीय की ‘जळतील पापे जन्मांतरीची’ ही भावना आपसुक मनात येऊन जाते आणि हात सारखा जमिनीकडून मस्तकाकडे जायला लागतो.मनोभावे य़ा भुमीला वंदन करावे वाटते. आणि ती कृती वारंवार होत राहते.
एकमेकांच्या पायी लागून फेर धरून नाचणारा वैष्णवजणाचा मेळा एक अपूर्व पर्वणी भासू लागतो. हे मागे पाहिलेच नाही. ही वाळवंटीची घाई आता नव्याने पाहतोय असाच भास होतो. आणि डोळे भरून येतात प्रवासाचा शिण कोठे पळालाय कोणास ठाऊक. नुसत्या जवळ येण्याने ही अवस्था आहे तर प्रत्क्ष भेटीत काय होईल कोणास ठाऊक? पांडूरंगाचे आपले अंतर अधिक कमी व्हावे आणि त्या सावळ्याची राजस सुकुमार मूर्ती डोळ्यासमोर दिसावी एवढीच एक ईच्छा आता मनात उरलेली. पावले पुढे सरकत राहतात. मन मात्र वाळवंटातील ते दृष्य मनात साठवत राहतं. कापूरवस्तू असल्यागत त्याला मनाच्या डब्बीत घट्ट बंद करून ठेवावे वाटते. अत्तर जसं कुपीत साठवले जाते तसे हे सगळे मनाच्या कुपीत साठवले जाते हे दृष्य सुगंध अन्यत्र देण्यासाठी.
वाळवंटात रंगलेला किर्तनाचा फड, पखवाज आणि मृदंगाचा नाद कानांना तृप्त करतो. ठोबा रखूमाईचा गजर मनात गुंजारव करू लागतो. आणि पावलं मंदिराकडे जाऊ लागतात. नामदेवाची पायरी लागते आणि मन तृप्त होत जातं. एक विलक्षण आनंद आणि अनामिक ओढ मनात दाटलेली असते. अरे हीच ती जागा जिथे नामा किर्तनी रंगायचा येथेच जनीला पांडूरंगाच्या दर्शनाची उत्कट ओढ लागायची. य़ेथेच कान्होपात्रा जगाच्या बंधनामुळे पांडुरंगाच्या भेटीसाठी कंठी प्राण आणुन वाट पाहत असायची. चोखा येथेच देवा भेट रे मला, म्हणुन आळवणी करायचा आणि तो सावळा देखील धर्ममार्तंडांच्या डोळ्यात भक्तीचे अंजन घालण्यासाठी बाहेर येऊन दर्शन द्यायचा. काय विलक्षण दृष्य असेल ते! हेच तर मिळवायचय. बाकी काही नको मनात आता एकच भावना असते. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नामदेव पायरीवर डोके आपाप झुकते. आणि पावलं पुढे सरकताता आता कशाची चिंता नसते.आता अन्य कशाची ओढ नसते, मनात ईतर कोणताङी विचार नसतो असते ती केवळ त्या सावळ्या घननिळाचे रूप पाहण्याची ओढ
झपाझप पावले राऊळात पडत जातात आपण त्या सावळ्याच्या घरात आलोत त्याच्या अगदी जवळ ही भावनाच पुलकीत करणारी असते. आता काही क्षणांची प्रतिक्षा वाटेतील देवांना, गरूड खांबाला आपोआप नमस्कार होत राहतो पण नजर असते ती केवळ विठूमाऊलीच्या रूपावर. कसा जगावेगळा देव आहे पहा. स्वत: पुरूष असुनही माऊली बनण्यात धन्यता माणतो. सासूरवाशीन सुन जशी अनेक दिवसांच्या खंडानंतर माहेरी आल्यावर आपल्या आईला भेटण्यासाठी उत्सुक असते तशीच ओढ प्रत्येक भक्ताच्या मनात असते. आपल्या आणि जगाच्या माऊलीला भेटण्याची. आणि तो प्रसंग येतो ज्यासाठी सगळा आटापिटा चाललेला असतो. गर्भगृहाच्या दारावर उभे राहताच त्या सावळ्याची घननिळ मुर्ती डोळ्यांना दिसू लागते आणि काय नवल डोळे आपोआप झरायला लागतात. जणु डोळ्यातील कचरा दूर व्हावा आणि त्या सावळ्याचे लोभस सुकूमार रूप स्वच्छ दिसावे. ललाटी गोपीचंदनाचा टिळा. डोळ्यात मायेचा अथांग सागर.कटी झळकणारा पितांबर. कटीवर हात आणि विटेवर उभा. अहाहा काय सुंदर रूप आहे. त्या सावळ्याचे
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रवी शशीकळा लोपलिया
हे वर्णन अत्यंत खरे आणि यतार्थ वाटू लागते. बाकी काही नको. केवळ त्या रूपाकडे पाहत राहवे एवढीच एक ईच्छा मनात राहते आता यानंतर काहीच नाही हेच अंतीम साध्य होते अशी भावना मनात येऊन जाते.
आवडे हे रूप सोजीरे सगुण पाहता लोचन सुखावले
लाचावले मन लागिलेसी गोडी ते जिवे न सोडी ऐसे झाले
दृष्टीपुढे राही ऐसाची तू देवा जो मी तुज पाहे पांडुरंगा
तुका म्हणे आम्ही केली जे लडीवीळी पुरवावी आळी मायबापे.
तुकारामांना या सोजि-या सगुण रूपाचे वेड का लागले असावे ते कळते. नुसते कळते असे नाही तर ते वेड अनुभवता येते. मनाला एक विलक्षण तृप्ती लाभते, पण ही तृप्ती देखील अतृप्ततेला आपल्यात साठवून असते. कारण त्या सावळ्याचे रूप असेच डोळ्यासमोर असावे असे वाटत असते. काही क्षणच मिळतात त्या घननिळाच्या समोर थांबण्यासाठी. पण भुक खुप मोठी असते. मागे मागे सरकावेच लागते कारण आपल्या मागे असाच कोणी आसुसलेला उभा असतो विठूरायाच्या चरणाला स्पर्शण्यासाठी. आपल्या हाताला त्या सावळ्याच्या पायाचा स्पर्श विलक्षण अनुभुती देऊन जातो, आणि त्याच अनुभुतीची प्रचिती मागच्याला यावी यासाठी पावले मागे चालत जातात. पण नजर मात्र त्याच्यावरच खिळलेली असते. जमेल तेवढे रूप मनात साठवत मागे सरकत जातो आणि गर्भगृहाच्या बाहेर कधी आलो ते कळत देखील नाही. नजर समोर आणि पाय मागे जात असतात. पायाच्या टाचा उंचावून ती सावळी मुर्ती पुन्हा पुन्हा पहावी वाटते. मागणे काहीच नाही, कसला नवस नाही, त्याचंही काहीच मागण नसतं. आम्ही त्याला पाहून तृप्त, नी आम्हाला समाधानी पाहून तो समाधानी. पावले मागे सरकत जातात, पण ती आत येतानाची अनिवार ओढ जाऊन पायात एक जडत्व आलेले. नको वाटत असताना बाहेर जावे लागतय. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतोय. मन भरत नाही तो आणि मनात तोच व्यापलेला. पुढे सरकत राहतो रखूमाईच्या भेटीसाठी मनात आणखी एक रूपाचा अभंग आळवत
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
बहूत सुकृताची गोडी म्हनुनी विठ्ठल आवडी........
सुशील कुलकर्णी
औरंगाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा